वारी एक अद्भुत सोहळा 🙏🚩

Gayatri Mokashi


महाराष्ट्राविषयी बोलताना इरावती कर्वे यांनी असं म्हंटलय की, "वारीला येणाऱ्या लोकांचे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र". पंढरीच्या वारी वेगळी याचा प्रत्यय ठाई ठाई येतो. म्हणून 'एक तरी वारी अनुभवावी असं म्हटलं जातं'. लाखो वैष्णवांचा सोहळा इंद्रायणीच्या काठी जमतो आणि

"नाचत जाऊ त्याच्या गावाला खेळिया,
सुख देईल विसावा रे,
तेने जन केला खेळीया रे."

असं गात गात विठू नामात तल्लीन होत पंढरीच्या वाटेवर हा मेळा चालायला लागतो.पंढरीच्या वाटेवर चैतन्य फुलून येतं.

          इंद्रायणीच्या काठी जगद्गुरु तुकोबारायांच्या आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊलींच्या पालखी प्रस्तानादिवशी लाखो वारकरी फुलून येतात. प्रस्थान सोहळा दिवशी देहू आणि आळंदी मध्ये नजर पडेल तिथे फक्त वारकरी पहायला मिळतात. ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात होत असलेला आनंद पाहायला मिळतो. हाच तो दिवस असतो ज्या दिवशी इंद्रायणी उत्सव पाहात असते. आनंदाचे डोही आनंद तरंग अशा भावनेने वारकरी बंधू इथे नाचताना दिसतात.
         पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असते. दुपारी देऊळवाड्यात दिंड्या येण्यास सुरुवात होते. या प्रस्थानासाठी जवळपास 47 दिंड्या देऊळवाड्यात येत असतात. प्रत्येक दिंडी मधले वारकरी ज्ञानबा तुकारामचा भाजनावर ठेका धरत नाचताना पाहायला मिळतात.

             झाली तरी म्हातारी कशी फुगडी घालते
             दुःख चालले अटत जशी वारी ही चालते    

हे असं पाहायला मिळतं. महिला वारकरी झिम्मा, फुगड्या खेळत, फेर धरत नाचायला सुरुवात करतात.... कारण हीच वारी महिलांना बंधन मुक्त करते. महिलांना वारीमध्ये मुक्तपणा मिळतो, संसाराची चिंता मागे सोडून पंधरा-वीस दिवस वारीमध्ये त्या आनंदाने चालत असतात. सासुरवाशिणीला माहेरात गेल्यावर कसं वाटतं तसं त्यांना पंढरीच्या वाटेवर वाटतं.
     
      

                टाळी वाजवावी गुढी उभारावी,
                   वाट ही चालावी पंढरीची.

असं म्हणत म्हणत हा प्रवास किती आनंदाचा होतो हे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. इथे ना जातीभेद पाहिला जातो ना लहानथोर. इथे तर नावानेही कोणाला हाक नसते.. हाक मारली जाते ती फक्त माऊली म्हणून.. प्रत्येक जण माऊलींच्या वारीत माऊली होऊन जातो. परिवर्तनाच्या दिशेने वारी वाट दाखवते हे खरंच आहे. सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी म्हणून सावळ्या विठुरायाच्या ओढीनं निघालेला वारकरी मला कोणत्याही तीर्थाची व्रताची गरज नाही असं सहज म्हणू शकतो कारण त्याला तुकोबांनी सांगितले की,

       पंढरीची वारी आहे माझे घरी,
       आणिक न करी तीर्थव्रत.
राम कृष्ण हरी चा जयघोष करत अंगात चैतन्य संचारत, बळ येत. वारकरी म्हणतात आम्हाला वारी चालण्याचं फळ नाही फक्त आस असते पंढरीच्या भेटीची.

        सर्व वारकरी इंद्रायणीकाठी जमतात, दिवेघाट चढतात, नीरास्नान होताना पाहतात, जेव्हा अश्‍व रिंगणात धावतात तेव्हा काळजात विठू नाचताना अनुभवतात, उडी मारतात, धावा करतात, खेळ खेळतात आणि पंढरीत विसावा घेतात. असा एक अद्भुत सोहळा आपल्याला पंढरीच्या वारीत पाहायला मिळतो. 

आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी,
राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

Comments

  1. अप्रतिम ..... राम कृष्ण हरी🙏🙏

    ReplyDelete
  2. राम कृष्ण हरी उत्तम वर्णन केले आहे अगदी वारी डोळ्यासमोर आहे असं वाटतय

    ReplyDelete

Post a Comment